
Tuesday, June 1, 2010
Wednesday, May 26, 2010
Tuesday, May 4, 2010
गोष्टींची गोष्ट
...तर , माझा मुलगाही माझ्या मागे 'गोष्टी सांग' म्हणून हट्ट धरू लागला. जुन्या, मला आठवत होत्या तेव्हढ्या राजा-राणीच्या गोष्टी सांगून झाल्या, मग रामायण-महाभारत झालं , इंग्लिश / मराठी कॉमिक्स वाचून दाखवली, माझा ऐकीव /वाचलेला साठा संपत चालला.
मुलाची वैचारिक भूक वाढत चालली होती. मग मी त्याच्यासाठी सचित्र गोष्टींची पुस्तकं आणली . वाटलं त्यातल्या चित्रकथांमध्ये तो रमेल. तसा झालंही . मी त्याच्या साठी 'नॉडी' ची बरीच पुस्तकं आणली होती . त्यातल्या characters वर तो भलताच खुश होता . नॉडी च्या जागी तो स्वतःला बघू लागला होता . नॉडी ची कार , त्याचं Toyland नावाचा गाव , त्याचे ट्बी बेअर, पिंक कॅट , स्कीटल वगैरे साथीदार त्याला भारी आवडले . रोज रात्री झोपताना तो ह्या पुस्तकांचा गठ्ठा माझ्या उशाशी आणून टाकायचा. ती पुस्तकं वाचल्या शिवाय झोपायचा नाही असा त्याने पायंडाच पडला.
पहिले काही दिवस सगळं नीट चालू होतं . मी गोष्टी सांगत होतो. पुस्तकातले नाट्य साभिनय करून दाखवत होतो. मुलाला मजा येत होती. त्या गोष्टी संपताच तो चटकन झोपीही जात असे. पण हळू हळू त्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येवू लागला. मग त्याने प्रश्न चालू केले ! त्यातले काही dialogues साधारण असे होते -
मी एका पानावर बोट ठेवून सांगू लागलो, 'एकदा काय झालं, नॉडी त्याची कार घेवून चालला होता , घनदाट जंगल होतं , नॉडी एकटाच त्या जंगलातून चालला होता ...' 'बाबा , घनदाट म्हणजे काय ?' त्याचा प्रश्न. 'घनदाट म्हणजे Thick, गर्दी असलेला'. मुलगा:'एकटाच का चालला होता तो? नॉडी चे आई बाबा कुठेयेत ?'. आता नॉडी चे आई बाबा खरतर त्यापैकी कुठल्याच पुस्तकात दिलेले नव्हते. ते काळे कि गोरे मला माहीतही नव्हता . मी काय उत्तर देणार कपाळ !
लवकरच हि पुस्तकं आणि चित्रकथा मागे पडली. नुकतेच त्याला कोणीतरी प्लास्टिक चे छोटे प्राणी गिफ्ट केले होते. त्यांच्या बदल त्याचं कुतूहल वाढला होतं . त्यांच्या गोष्टी त्याने मला सांगायला सागितलं . मला काही ठरविक पंचतंत्र वगैरे गोष्टी माहित होत्या त्या सांगून संपल्या . मग त्याने नवी कल्पना काढली तो मला प्राणी सांगत असे आणि मग त्या प्राण्यांच्या गोष्टी मी On the fly सांगायच्या असा उपक्रम चालू झाला . हे प्राणी नेहमी multiples मधेच असायचे. 2 हत्ती आणि 2 किडे, 1 गरुड आणि 3 उंदीर, 4 जिराफ आणि 1 गाय. etc. का ते मला कधीच उमगले नाही. कदाचित सिंगल प्राण्याची कोणती न कोणती गोष्ट त्याने ऐकलेली असावी !
त्यापैकी हि एक - 'कासवाची फजिती'
ससा आणि कासवाची जगविख्यात गोष्ट जी मला तुम्हाला माहितीये ती त्यालाही ऐकायची नव्हती मग व्हेरिएशन होतं २ ससे आणि ३ कासवं. अर्थात सशाची रेस बोंबलली, त्या जागी लपाछपी घुसवावी लागली. गोष्ट अशी झाली :
दोन ससे होते . एक पांढरा , एक काळा आणि त्यांची ३ कासावांशी मैत्री होती . मग तो म्हणाला 'म्हणजे Big Medium Small का ? ' म्हटलं 'हो करेक्ट!. Big medium small.' एकदा ते सगळे लपाछपी खेळत होते . Big कासवावर राज्य आला . ससे आणि इतर कासवं लपून बसली . Big कासव त्यांना शोधायला लागलं . बराच वेळ तो त्यांना शोधात होतं , त्याने सगळा परिसर शोधला . पण कोणीच सापडेना . मग एका अंधाऱ्या खोलीत त्याला पांढरा ससा दिसला . मग त्याने त्याला आउट केलं . मग तो काळ्या सशाचा अंदाज घेऊ लागला .. आपले चारी पाय हळू हळू फिरवत तो खोलीभर फिरू लागला.
अंधारामुळे त्याला काळा ससा दिसत नव्हता . मग अचानक त्याला अंधारात काहीतरी चमकताना दिसलं . ते काळ्या सशाचे डोळे होते . मग त्याने त्यालाही आउट केलं . मग तो इतर दोन कासवांना शोधू लागला ..ती मात्र जाम सापडेचनात . तो पार दमून गेला . मुलाचा चेहरा चिंताग्रस्त झाला . त्याची उत्कंठा ताणली गेली असावी . 'कुठे होती ती दोन कासव ? Medium आणि Small?' तो म्हणाला . मला एव्हाना झोप यायला लागली होती ... एंड काही केल्या सुचत नव्हता ...
मी कासवाला अजून थोडा वेळ फिरवलं. आणि एकदम काहीतरी सुच्ल्यासारखं केलं, म्हटलं .'मग ससे त्याला म्हणाले 'तू हरलास कबूल कर. कासवही थकल होतं. निराशेने म्हणालं हरलो बुवा. ससे लागले हसायला ...आणि पाहतो तो काय त्याच्या पाठीवरून Medium आणि Small टुणकन उडी मारून खाली आले ...' मग सगळ्यांनी त्याला हरला-हरला चिडवलं '. मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . गोष्ट त्याला कळली होती पण त्यातला चिडवणं त्याला पटलं नव्हतं. त्या बिग कासवाचा अपमान त्याला सहज पचला नाही. 'ए SSSSS असं चीडवायच नाही.' मुलगा चिडला होता. 'तो बिग आहे ... असं मारेल न चिडला तर ..' तो त्वेषाने म्हणाला. 'अरे हो बिग आहे पण त्याला कळायला हवा होतं. त्याला चालताना जाणवलं असेल न कोणीतरी पाठीवर बसलंय ते . म्हणून कोणतीही गोष्ट हरवली तर आधी आजूबाजूला बघायचं, डोळे उघडे ठेवून शोध घ्यायचा. निराश व्हायचं नाही लगेच, हरायचं नाही लगेच. कळलं???, नाहीतर अशी त्या बिग कासवासारखी फजिती होते.' (हे होतं : Moral of the story !)
काही असो, गोष्ट त्याला आवडली होती. तो आनंदाने झोपी गेला. अशी एकंदरीत गम्मत चालू आहे.
कधी-कधी माझे गोष्टीतले तात्पर्य सांगायला चुकते. गोष्टीचा आणि तात्पर्याचा संबंध साफ चुकतो. ४ किडे आणि २ हत्ती यांच्या मधल्या सगळ्याच प्राण्यांचं नाट्य दरवेळी जमतंच असं नाही. बहुतेकदा गणित चुकतही, एखाद्या प्राण्याचा शेवटी हिशोबच लागत नाही. त्याच्या प्रश्नांनी मग तो मला हैराण करतो. कधी गोष्ट सांगताना मीच झोपी जातो... अशा घटना होतात. पण एकंदरीत सध्या तरी अशा multiple प्राण्यांच्या custom गोष्टींवर तो समाधानी आहे असं म्हणायला हरकत नाही.
Wednesday, April 28, 2010
देव नाही देवालयी !
तो दिवस काही फारसा वेगळा उगवला नव्हता , पण मला कुणास ठावूक नेहमीपेक्षा बऱ्याच लवकर जाग आली . पुन्हा झोप येईना. मग उठलो , म्हटलं लवकर जाग आलीये तर आळस झटकून बाहेर फिरून यावं . घरासमोरच एक छोटी टेकडी होती , टेकडीवर भवानी देवीचं मंदिर होतं, घरासमोर मंदिर असूनही मी तेव्हापर्यंत तिथे कधीच गेलो नव्हतो . कुतूहल मात्र बराच होतं. आज चांगली संधीही होती . पहाटेपासूनच तिथे फिरायला येणर्या लोकांची ये-जा चालू असायची . त्यांच्या पासून स्फूर्ती घेवून निघालो ।
मंदिरापाशी पोचायला एक नेहमीची पायऱ्यांची वाट होती . मला ती नेहमीची वाट नको होती. माणसांची गर्दी नको होती . टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी अनेक लहान मोठ्या पाऊलवाटा झेपावल्या होत्या , त्यातली एक वांट धरून मंदिराकडे जावू लागलो . रमत गमत , सूर्योदयाचे विहंगम दृश्य न्याहाळत , दव भरल्या पानांची सळसळ ऐकत ।
अर्धा -एक तास मी चालत होतो . मंदिर जवळ येण्याचा मात्र चिन्ह दिसेना . मी बराच वेळ चालत होतो . माझा संयम संपत चालला . आपण रस्ता चुकलोय कि काय असा वाटायला लागलं. मनात नानाविध शंका येवू लागल्या . बरं कोणाला विचारावा तर हि तशी एकाकी पाऊलवाट होती . निर्मनुष्य होती.
काही वेळ मी तसाच चालत राहिलो . आणि थोड्या वेळानी लांबून एक म्हातारा काहीतरी गोळा करत असलेला दिसला . मी त्याच्याकडे जावू लागलो . प्रथम दर्शनी तो मला कचरा गोळा करतोय असं वाटलं होतं ते खरच होतं . तो टेकडीवरचा कचरा गोळा करत होतं . 'आजोबा , इथे मंदिराकडे कुठून जायचा ?' मी त्याला थेट प्रश्न विचारला . माझ्या अचानक येण्याने तो थोडा दचकला . इतक्यावेळ मन लावून चाललेल काम त्याने थांबवला , जरा सावरून माझ्याकडे पहिला . बहुतेक त्याने माझा प्रश्न नीट ऐकला नसावा असं समजून मी पुन्हा प्रश्न विचारला 'इथे देवाकडे जायचा रस्ता कुठेय सागता का जरा ?'. म्हातारा जरासा हसला . काही नं बोलताच त्याने एका दिशेकडे बोट दाखवलं . 'तिकडे '।
मी त्याने दाखवलेल्या दिशेकडे वळून बघितला . 'नक्की का ?' म्हातारा पुन्हा तसाच हसला . त्याने होरार्थी फक्त मान डोलावली . मी त्या दिशेने वर जावू लागलो .
हळू हळू टेकडीचा माथा जवळ येवू लागलं . एक पडकी इमारत दिसू लागली . मंदिर कुठेच दिसेना ! मला आता वेगळीच शंका येवू लागली . म्हातार्याने आपल्याला फसवलं तर नाही ? आपली मजा घ्यायची म्हणून मुद्दाम चुकीचा रस्ता तर नाही दाखावला ? एक ना अनेक . पण चिडण्या खेरीज काहीच करता न येण्यासारखा होतं . मी मुकाट खाली येवू लागलो . एवढ्यात आणखी एकजण वर येताना दिसला . त्याच्या पोशाखावरून तो टेकडीवर नेहमी फिरायला येणाऱ्या लोकांपैकी असावा असं वाटत होतं . मी त्याला विचारलं . 'एक्स्क्यूज मी , इथे मंदिराकडे कसा जायचं,? ' . 'अहो ते काय' . 'डावीकडच्या गर्द झाडीकडे बोट दाख्वोन तो म्हणाला . त्या वळणावरून सरळ जा . तुम्ही थोडं चुकलात . एक वळण मागे तुम्हाला सरळ नं जाता डावीकडे एक छोटा रस्ता लागतो तिथून यायला पाहिजे होतं !'. 'ओह ! धन्यवाद ' मी त्याचे आभार मानले. मनात त्या म्हातार्याचा राग उफाळून येत होतं . त्याला दोन शब्द जास्त बोलायला काय झालं होतं ? मी त्या दिशेने चालत गेलो . मंदिर नुकतंच बांधून झालं होतं. पायातले बूट काढून मी आत गेलो . गाभार्यात जावून नमस्कार करावा म्हणून आत गेलो . आणि बघतो तो काय !
...आत देवच नव्हता !
अजून मूर्ती स्थापना व्ह्यायची असावी ! हे भवानी मातेचं मंदिर आधी मेन रोडवर होतं , इतक्यातच लोकांचा प्रतिकार डावलून महापालीकाने ते टेकडीवर हलवण्याचा निर्णय घेतला होतं हे ठावूक असूनही मी थोडा निराश झालो . मी काही फारसा भाविक किंवा देवभोळा नाही तरी इतके कष्ट घेवून आलोच आहे तर देव दर्शन व्ह्यायला पाहिजे होतं अशी कुठेतरी खंत वाटली . मगाशी भेटलेल्या म्हातार्याचा पुन्हा राग आला . मंदिरात देव नाही तर त्याला सांगता आलं असता तसा. त्या दुसर्या माणसानेही नाही सागितलं . असं का वागतात लोकं?
त्याच निराश अवस्थेत टेकडी उतरू लागलो . मनात विचार आला कि म्हातारा परत दिसला तर त्याला जाब विचारायचाच . आणि नेमका तो एका वळणावर भेटलाच मला। तेच काम चालू होतं त्याचं . 'काय आजोबा ' मी जरा चिडूनच बोलू लागलो ' मंदिर रिकामं आहे वरचं ', 'सांगायचं नं अजून बांधकाम पूर्ण व्ह्यायचं आहे, देव बसला नाहीये ते !'. म्हातारा काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला, मग त्याच्या चेहऱ्यावर तेच ट्रेड मार्क हसू उमटलं. तो उत्तरला 'अरं माजा द्येव हाय कि वरला .' माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. म्हातारा पुढे म्हणाला , ' अरं आमी गरीब मान्स , कचरा इकून पैका जोड्तू , वरल्या अंगाला एक पडका हौद दिसला का न्हाई तुला , थितच आमच्या पाट्या टाक्तू , मुकादम थितच हिसाब करतू अन पैका देतु . त्या हौदापाशी माज्या पोरासोरंच प्वाट हाय बघ, मग त्योच माझा द्येव न्हाई का ?' सांग तूच '. ..
मी गारच झालो . म्हातारा खूप मोठा विचार मांडत होता . त्याच्या सुरकुतलेल्या चेह्र्याय्वर आता मला त्याच्या आयुष्याचं तत्वज्ञान दिवसायला लागलं . त्याचा देव त्याला पक्का ठावूक होता. तो अजिबात खोटं बोलला नव्हता . मला माझीच लाज वाटली . म्हतार्यानी पुन्हा माझ्यकडे पहिला . 'समद्या वाटा द्येवापातूर जात्यात बाबा. आपली अपुन वळखावी . द्येव घावतोच ...' म्हातार्याने मला पुरता अवाक केलं होता. मनात बरंच काही साचू लागलं. मी नुसताच 'खरय ' असा मोघम उत्तर देवू शकलो. घरी परतलो .
एव्हाना चांगली लख्ख सकाळ झाली होती . अस्वस्थता वाढत होती. खिडकीपाशी येवून बराच वेळ मी त्या मंदिराकडे पाहात राहिलो . विचार करत राहिलो . म्हातार्याच्या बोलण्याचा अर्थ लावत राहिलो . एकाएकी मला त्या मंदिराभोवती अभंगाचा एक मोठा ढग तरंगताना दिसू लागला. आजवर नीट नं उमगलेला देव , धर्म , दैवी अस्तित्व आणि त्या अभंगातला गहन गूढ आशय मनोमन उलगडू लागला ....स्पष्ट होत गेला...
देव देव्हार्यात नाही,
देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे ,
देवा दाही दिशी कोंडे
देव आभाळी सागरी ,
देव आहे चराचरी
देव शोधुनिया पाही ,
देव सर्वभूता ठायी
देव देव्हार्यात नाही ,
देव नाही देवालयी !
Friday, April 23, 2010
आज का अर्जुन !
आज का अर्जुन !
लहान मुलं आपल्याला खरंच कधी-कधी मोठ्या मुष्किल परिस्थिती मधे टाकतात. उत्तर नाही दिलं तर त्यांचं कुतूहल मारल्याचं असमाधान आणि उत्तर दिलं तर आपलीच फजिती होण्याचा संभव, अशा, इकडे आड आणि तिकडे विहीर परिस्थितीत आपण सापडतो .
परवा असंच झालं. मुलाला घेवून एका लग्नात गेलो होतो. माझे एक दूरचे नातेवाईक भेटले. वयस्कर. ६५-७० वयाचे असतील. आमच्या गप्पा चालू झाल्या. त्यांनी डोक्यावर 'फर' ची कॅप घातली होती. मुलगा बराचवेळ त्यांचं निरीक्षण करत होता. थोड्यावेळानी तो माझा हात ओढायला लागला. मी अनिच्छेने त्याच्याकडे बघितलं . मनात वेगळ्याच शंका. शु /शी तर नसेल ! असल्या गोष्टी मुलांना नको तेव्हा हमखास आठवतात. पण तसलं काही नव्हतं ... 'काय रे ?' मी जरा त्रासूनच विचारलं. 'बाबा यांनी घरात टोपी का घातलीये?', 'आमच्या मिस म्हणतात घरात आणि शाळेत टोपी घालायची नाही, फक्त उन्हात आणि आऊट डोअर चालते घातली तर'. मुलाचे धीट आणि थेट उत्तर आले. 'अरे ते काढतील थोड्या वेळानी' . काहीतरी वेळ मारून नेण्यासाठीच माझं उत्तर. मुलाचं कुतूहल संपलं नव्हत. उलट थोडं वाढलंच असावं .
नंतर जेवणाची वेळ होईपर्यंत त्याची नजर पूर्णत: त्या काकांवरच होती. 'काका टोपी कधी काढणार ?' हा प्रश्न त्यांनी किमान पन्नास वेळा तरी विचारला असेल. मी काहीबाही सांगून थकत चाललो होतो. जेवणाची वेळ झाली. काका पंगतीकडे जावू लागले. मुलगा पुन्हा हात ओढू लागला. 'बाबा भूक लागली '. आप्तांशी रंगलेल्या गप्पा अर्धवट टाकून मीही जेवणाच्या हॉलकडे चालू लागलो. मुलगा काकांच्या शेजारच्या रिकाम्या जागेवर पळत गेला. ओघाने मीही त्याच्या शेजारीच बसलो. मुलाचा पुन्हा प्रश्न: 'बाबा , हे टोपी का काढत नाहीयेत अजून?'. 'अरे टोपी त्यांची आहे , त्यांना वाटेल तेव्हा काढतील , तुला काय? तू घरी बूट घालून जेवतोस का कधी ? पण इथे बूट घालून जेवणार आहेस नं ?' मी जमेल तेव्हढ
लॉजिक एकवटून त्याला शांत करत उत्तरलो. पण छे ! ...मुलगा माझाच होता. त्यानी माझ्याकडे पाहून जीभ बाहेर काढून फक्त 'ऊ ssssss' करून वेडावून दाखवलं.
जेवण संपेपर्यंत तो काकांकडे वळून वळून बघत होता. मी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून बघितले. त्याला जिलेबीचं आमिषही दाखवून पाहिलं. पण व्यर्थ !
जेवणं होत आली. हातावर पाणी पडताच मुलानी त्याच्या मोठ्या चुलत बहिणीकडे धाव घेतली. माझी उत्तरं त्याला अगदीच निरर्थक वाटली असावीत म्हणून तो आता त्याच्या मोठ्या बहिणीकडे 'एक्स्पर्ट ओपिनियन' घ्यायला पळाला होता. माझी त्या भयंकर परिस्थितीमधून सुटका झाली म्हणून मला मात्र जरा हायसं वाटत होतं. थोडा वेळ सुखात गेला.
लोकं एकमेकांचा निरोप घेवून जायला लागले. आमचीही जाण्याची वेळ आली. आम्ही बाहेर पडू लागलो . मुलगा आता गालातल्या गालात हसत होता. त्याच्या बहिणीने त्याला काय सांगितलं होतं कुणास ठावूक ! मला पुढच्या संभाव्य धोक्याची जाणीव झाली..... आणि तेव्हढ्यात नको ते घडलंच !
तेच काका, काकूंबरोबर बाहेर पडत होते. मुलगा क्षणाचीही उसंत न घेता ओरडला ' काकाआजोबा मला माहितीये तुम्ही टोपी का नाही काढलीत ते. आर्याने सांगितलंय मला ... तुम्हाला टक्कल पडलाय न ? ही: ही: ही:..... काका ओशाळले. काय ऊतर द्यावे ते त्यांना कळेना. मी तर संपलोच होतो. एव्हाना आजूबाजूची चार टाळकिही बघायला लागली होती . 'अर्जुनsss बाsssस , माsssर मिळेल आता', मी उसन्या अवसानाने ओरडलो. मुलगा जरा शांत झाल्यासारखा दिसला. काही क्षण तीच असहाय्य शांतता...
काका ओशाळवाणे हसत जावू लागले आणि मुलगा पुन्हा निर्णायक ओरडला 'आता तरी टोपी काढा नं काकाआजोबा, मला तुमची गम्मत माहितीये , ही: ही: ' !
'बॉम्बे टू गोवा' पिक्चर मधला एका सीन आठवला. एका द्वाड मुलाला त्याचे आई बाप मुसक्या बांधून नेतात ते दृष्य आठवलं. त्या वेळी तरी मला अर्जुनला तसंच काही करावंसं वाटलं होतं.
Thursday, April 15, 2010
श्री गणेशा
१) फेथ - जॉर्ज मायकल..... नुकतीच दहावी पास झालेल्या कोणत्याही मुलाला आवडेल अस हे गाणं आहे..त्याच वयात ही कॅसेट हातात आली आणि अक्षरश: मी त्यातल्या गाण्यांची पारायणं केली ... जॉर्ज मायकल हा त्यावेळी आमचा आदर्श होता...त्याच्या सारखी खुरटलेली दाढी आपल्या गालावर कधी उगवते याची मी आतुरतेनी वाट बघितल्याचं आठवतंय ! हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं...
अजूनही ऐकायला आवडतं...विशेषत: त्यातला गिटार चा पीस..
एकदम सॉलिड...
२) माय नेम इज लुका - सुजेना वेगा , त्या वयात या गाण्याचा अर्थ पण कळत नव्हता ! चाल सही होती ...आज पर्यंत पुन्हा पुन्हा ऐकतो ... आता विकिपीडिया मधून गाण्याचाइतिहास पण कळला...आता लक्षात आल की हे खरतर निरर्थक आहे ...सुजेना वेगा ज्या अपार्टमेन्ट मधे रहायची तिथे एक लुका नावाचा मुलगा रहायला आला अणि तो इतरांपेक्षा अलूफ़ असल्याने सुज़ेनाला त्याच्या बद्दल कुतूहल वाटायला लागल..आणि तिनी त्याच्यावर चक्क एक गीतच लिहिल... तेच हे माय नेम इज लुका...
३) पापा डोंट प्रीच - मड़ोंना - ही कॅसेट लावून लावून झीजली होती....इतक्यावेला ऐकली होती... या एल्बम मधे बहुतेक गाणी हीट होती .... ओपन योंउर हार्ट टू मी , ला इस्ला बोनिता इत्यादी, इत्यादी , .... घरी धमाल वाजणारा डेक होता ....कॉस्मिक चा... अणि त्याला बाबांनी amplifier लावलेला होता... फूल वोल्यूम मधे ही ढाक्चिक गाणी ऐकायला मजा यायची ...अजूनही आवडतात...
४) पार्ट टाइम लवर - स्टीवी वंडर - काहीतरी हवहवस होत या गाण्यात .... त्याचा भड़क अर्थ नंतर लक्षात आला अणि जाहिर ऐकण अपोआप कमी झाल... स्टीवी वंडर ब्लाइंड आहे हे कलल्यानन्तर अधिकच आवडायला लागला ......बीट्स सही होते .... स्टीवी वंडर चा आवाज भलताच आवडला होंता पण त्यानंतर त्याची इतर गाणी विशेष पटली नाहीत. आय जस्ट called टू से आय लव यु हे एकच नंतर पटल....
५) पहला नशा - फुल्टू रोमँटिक ...म्हणजे काही विचारायची सोयच नाही... हिंदी गाणी घरात फार क्वचित वाजायची पण हे एक गाण भरपूर ऐकल...एन्जॉय केल.... मनापासून आजही ऐकतो ....आणि तेव्हढाच एन्जॉय करतो....
गाण्याचा एक आहे ...एक-एका गाण्याबरोबर तुमच्या आयुष्यातला एखादा भाग/ प्रसंग पूर्णत: जोडला गेलेला असतो .... गाणी नोस्टालजिक असतात ... तुम्हाला भूतकालात घेवून जातात आणि म्हणूनच कदाचित ती आपल्याला आवडतात आणि पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात! नाही का?