Tuesday, May 4, 2010

गोष्टींची गोष्ट

लहानपणी आपण सगळ्यांनीच आई वडलांकडून, आजी आजोबांकडून वगैरे गोष्टी ऐकल्या आहेत. मला आठवतंय मी माझ्या दोन्ही आज्ज्यांकडून माझ्या लहानपणी भरपूर गोष्टी ऐकायचो. त्या काळातली लोकं ग्रेट होती . त्यांचा 'काव्य-शास्त्र-विनोद' यांचा व्यासंग अफाट होता. त्या काळात खरंतर आजच्या इतकं मिडिया एक्स्पोजर नव्हतं. मुख्य म्हणजे TV नव्ह्ता. वाचन हाच विरंगुळा, वाचन हीच करमणूक, वाचन हाच मिडिया. तरी त्यांच्याकडे ज्ञानाचं, विचारांचं, गोष्टींचं केव्हढ भांडार होतं. आपल्या पिढीची इथेच बोंब आहे. TV, सिनेमा मुळे वाचन मागे पडलंय. ते दाखवतात तेच बघण्याची सवय लागलीये. एका अर्थाने आपण आपलं आयुष्य , करमणुकीच्या कल्पना आणि बहुतांशी आपलं व्हिजन त्यांच्या हवाली केलंय असं मला वाटतं. असो .... तो माझ्या या लेखाचा विषय नाही. ओघाने आलं आणि सांगाव वाटलं एव्हढंच.

...तर , माझा मुलगाही माझ्या मागे 'गोष्टी सांग' म्हणून हट्ट धरू लागला. जुन्या, मला आठवत होत्या तेव्हढ्या राजा-राणीच्या गोष्टी सांगून झाल्या, मग रामायण-महाभारत झालं , इंग्लिश / मराठी कॉमिक्स वाचून दाखवली, माझा ऐकीव /वाचलेला साठा संपत चालला.

मुलाची वैचारिक भूक वाढत चालली होती. मग मी त्याच्यासाठी सचित्र गोष्टींची पुस्तकं आणली . वाटलं त्यातल्या चित्रकथांमध्ये तो रमेल. तसा झालंही . मी त्याच्या साठी 'नॉडी' ची बरीच पुस्तकं आणली होती . त्यातल्या characters वर तो भलताच खुश होता . नॉडी च्या जागी तो स्वतःला बघू लागला होता . नॉडी ची कार , त्याचं Toyland नावाचा गाव , त्याचे ट्बी बेअर, पिंक कॅट , स्कीटल वगैरे साथीदार त्याला भारी आवडले . रोज रात्री झोपताना तो ह्या पुस्तकांचा गठ्ठा माझ्या उशाशी आणून टाकायचा. ती पुस्तकं वाचल्या शिवाय झोपायचा नाही असा त्याने पायंडाच पडला.

पहिले काही दिवस सगळं नीट चालू होतं . मी गोष्टी सांगत होतो. पुस्तकातले नाट्य साभिनय करून दाखवत होतो. मुलाला मजा येत होती. त्या गोष्टी संपताच तो चटकन झोपीही जात असे. पण हळू हळू त्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येवू लागला. मग त्याने प्रश्न चालू केले ! त्यातले काही dialogues साधारण असे होते -

मी एका पानावर बोट ठेवून सांगू लागलो, 'एकदा काय झालं, नॉडी त्याची कार घेवून चालला होता , घनदाट जंगल होतं , नॉडी एकटाच त्या जंगलातून चालला होता ...' 'बाबा , घनदाट म्हणजे काय ?' त्याचा प्रश्न. 'घनदाट म्हणजे Thick, गर्दी असलेला'. मुलगा:'एकटाच का चालला होता तो? नॉडी चे आई बाबा कुठेयेत ?'. आता नॉडी चे आई बाबा खरतर त्यापैकी कुठल्याच पुस्तकात दिलेले नव्हते. ते काळे कि गोरे मला माहीतही नव्हता . मी काय उत्तर देणार कपाळ !


लवकरच हि पुस्तकं आणि चित्रकथा मागे पडली. नुकतेच त्याला कोणीतरी प्लास्टिक चे छोटे प्राणी गिफ्ट केले होते. त्यांच्या बदल त्याचं कुतूहल वाढला होतं . त्यांच्या गोष्टी त्याने मला सांगायला सागितलं . मला काही ठरविक पंचतंत्र वगैरे गोष्टी माहित होत्या त्या सांगून संपल्या . मग त्याने नवी कल्पना काढली तो मला प्राणी सांगत असे आणि मग त्या प्राण्यांच्या गोष्टी मी On the fly सांगायच्या असा उपक्रम चालू झाला . हे प्राणी नेहमी multiples मधेच असायचे. 2 हत्ती आणि 2 किडे, 1 गरुड आणि 3 उंदीर, 4 जिराफ आणि 1 गाय. etc. का ते मला कधीच उमगले नाही. कदाचित सिंगल प्राण्याची कोणती न कोणती गोष्ट त्याने ऐकलेली असावी !

त्यापैकी हि एक - 'कासवाची फजिती'

ससा आणि कासवाची जगविख्यात गोष्ट जी मला तुम्हाला माहितीये ती त्यालाही ऐकायची नव्हती मग व्हेरिएशन होतं २ ससे आणि ३ कासवं. अर्थात सशाची रेस बोंबलली, त्या जागी लपाछपी घुसवावी लागली. गोष्ट अशी झाली :

दोन ससे होते . एक पांढरा , एक काळा आणि त्यांची ३ कासावांशी मैत्री होती . मग तो म्हणाला 'म्हणजे Big Medium Small का ? ' म्हटलं 'हो करेक्ट!. Big medium small.' एकदा ते सगळे लपाछपी खेळत होते . Big कासवावर राज्य आला . ससे आणि इतर कासवं लपून बसली . Big कासव त्यांना शोधायला लागलं . बराच वेळ तो त्यांना शोधात होतं , त्याने सगळा परिसर शोधला . पण कोणीच सापडेना . मग एका अंधाऱ्या खोलीत त्याला पांढरा ससा दिसला . मग त्याने त्याला आउट केलं . मग तो काळ्या सशाचा अंदाज घेऊ लागला .. आपले चारी पाय हळू हळू फिरवत तो खोलीभर फिरू लागला.

अंधारामुळे त्याला काळा ससा दिसत नव्हता . मग अचानक त्याला अंधारात काहीतरी चमकताना दिसलं . ते काळ्या सशाचे डोळे होते . मग त्याने त्यालाही आउट केलं . मग तो इतर दोन कासवांना शोधू लागला ..ती मात्र जाम सापडेचनात . तो पार दमून गेला . मुलाचा चेहरा चिंताग्रस्त झाला . त्याची उत्कंठा ताणली गेली असावी . 'कुठे होती ती दोन कासव ? Medium आणि Small?' तो म्हणाला . मला एव्हाना झोप यायला लागली होती ... एंड काही केल्या सुचत नव्हता ...

मी कासवाला अजून थोडा वेळ फिरवलं. आणि एकदम काहीतरी सुच्ल्यासारखं केलं, म्हटलं .'मग ससे त्याला म्हणाले 'तू हरलास कबूल कर. कासवही थकल होतं. निराशेने म्हणालं हरलो बुवा. ससे लागले हसायला ...आणि पाहतो तो काय त्याच्या पाठीवरून Medium आणि Small टुणकन उडी मारून खाली आले ...' मग सगळ्यांनी त्याला हरला-हरला चिडवलं '. मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले . गोष्ट त्याला कळली होती पण त्यातला चिडवणं त्याला पटलं नव्हतं. त्या बिग कासवाचा अपमान त्याला सहज पचला नाही. 'ए SSSSS असं चीडवायच नाही.' मुलगा चिडला होता. 'तो बिग आहे ... असं मारेल न चिडला तर ..' तो त्वेषाने म्हणाला. 'अरे हो बिग आहे पण त्याला कळायला हवा होतं. त्याला चालताना जाणवलं असेल न कोणीतरी पाठीवर बसलंय ते . म्हणून कोणतीही गोष्ट हरवली तर आधी आजूबाजूला बघायचं, डोळे उघडे ठेवून शोध घ्यायचा. निराश व्हायचं नाही लगेच, हरायचं नाही लगेच. कळलं???, नाहीतर अशी त्या बिग कासवासारखी फजिती होते.' (हे होतं : Moral of the story !)

काही असो, गोष्ट त्याला आवडली होती. तो आनंदाने झोपी गेला. अशी एकंदरीत गम्मत चालू आहे.

कधी-कधी माझे गोष्टीतले तात्पर्य सांगायला चुकते. गोष्टीचा आणि तात्पर्याचा संबंध साफ चुकतो. ४ किडे आणि २ हत्ती यांच्या मधल्या सगळ्याच प्राण्यांचं नाट्य दरवेळी जमतंच असं नाही. बहुतेकदा गणित चुकतही, एखाद्या प्राण्याचा शेवटी हिशोबच लागत नाही. त्याच्या प्रश्नांनी मग तो मला हैराण करतो. कधी गोष्ट सांगताना मीच झोपी जातो... अशा घटना होतात. पण एकंदरीत सध्या तरी अशा multiple प्राण्यांच्या custom गोष्टींवर तो समाधानी आहे असं म्हणायला हरकत नाही.