Wednesday, April 28, 2010

देव नाही देवालयी !

तो दिवस काही फारसा वेगळा उगवला नव्हता , पण मला कुणास ठावूक नेहमीपेक्षा बऱ्याच लवकर जाग आली . पुन्हा झोप येईना. मग उठलो , म्हटलं लवकर जाग आलीये तर आळस झटकून बाहेर फिरून यावं . घरासमोरच एक छोटी टेकडी होती , टेकडीवर भवानी देवीचं मंदिर होतं, घरासमोर मंदिर असूनही मी तेव्हापर्यंत तिथे कधीच गेलो नव्हतो . कुतूहल मात्र बराच होतं. आज चांगली संधीही होती . पहाटेपासूनच तिथे फिरायला येणर्या लोकांची ये-जा चालू असायची . त्यांच्या पासून स्फूर्ती घेवून निघालो ।

मंदिरापाशी पोचायला एक नेहमीची पायऱ्यांची वाट होती . मला ती नेहमीची वाट नको होती. माणसांची गर्दी नको होती . टेकडीच्या माथ्यावर जाण्यासाठी अनेक लहान मोठ्या पाऊलवाटा झेपावल्या होत्या , त्यातली एक वांट धरून मंदिराकडे जावू लागलो . रमत गमत , सूर्योदयाचे विहंगम दृश्य न्याहाळत , दव भरल्या पानांची सळसळ ऐकत ।

अर्धा -एक तास मी चालत होतो . मंदिर जवळ येण्याचा मात्र चिन्ह दिसेना . मी बराच वेळ चालत होतो . माझा संयम संपत चालला . आपण रस्ता चुकलोय कि काय असा वाटायला लागलं. मनात नानाविध शंका येवू लागल्या . बरं कोणाला विचारावा तर हि तशी एकाकी पाऊलवाट होती . निर्मनुष्य होती.

काही वेळ मी तसाच चालत राहिलो . आणि थोड्या वेळानी लांबून एक म्हातारा काहीतरी गोळा करत असलेला दिसला . मी त्याच्याकडे जावू लागलो . प्रथम दर्शनी तो मला कचरा गोळा करतोय असं वाटलं होतं ते खरच होतं . तो टेकडीवरचा कचरा गोळा करत होतं . 'आजोबा , इथे मंदिराकडे कुठून जायचा ?' मी त्याला थेट प्रश्न विचारला . माझ्या अचानक येण्याने तो थोडा दचकला . इतक्यावेळ मन लावून चाललेल काम त्याने थांबवला , जरा सावरून माझ्याकडे पहिला . बहुतेक त्याने माझा प्रश्न नीट ऐकला नसावा असं समजून मी पुन्हा प्रश्न विचारला 'इथे देवाकडे जायचा रस्ता कुठेय सागता का जरा ?'. म्हातारा जरासा हसला . काही नं बोलताच त्याने एका दिशेकडे बोट दाखवलं . 'तिकडे '।

मी त्याने दाखवलेल्या दिशेकडे वळून बघितला . 'नक्की का ?' म्हातारा पुन्हा तसाच हसला . त्याने होरार्थी फक्त मान डोलावली . मी त्या दिशेने वर जावू लागलो .

हळू हळू टेकडीचा माथा जवळ येवू लागलं . एक पडकी इमारत दिसू लागली . मंदिर कुठेच दिसेना ! मला आता वेगळीच शंका येवू लागली . म्हातार्याने आपल्याला फसवलं तर नाही ? आपली मजा घ्यायची म्हणून मुद्दाम चुकीचा रस्ता तर नाही दाखावला ? एक ना अनेक . पण चिडण्या खेरीज काहीच करता न येण्यासारखा होतं . मी मुकाट खाली येवू लागलो . एवढ्यात आणखी एकजण वर येताना दिसला . त्याच्या पोशाखावरून तो टेकडीवर नेहमी फिरायला येणाऱ्या लोकांपैकी असावा असं वाटत होतं . मी त्याला विचारलं . 'एक्स्क्यूज मी , इथे मंदिराकडे कसा जायचं,? ' . 'अहो ते काय' . 'डावीकडच्या गर्द झाडीकडे बोट दाख्वोन तो म्हणाला . त्या वळणावरून सरळ जा . तुम्ही थोडं चुकलात . एक वळण मागे तुम्हाला सरळ नं जाता डावीकडे एक छोटा रस्ता लागतो तिथून यायला पाहिजे होतं !'. 'ओह ! धन्यवाद ' मी त्याचे आभार मानले. मनात त्या म्हातार्याचा राग उफाळून येत होतं . त्याला दोन शब्द जास्त बोलायला काय झालं होतं ? मी त्या दिशेने चालत गेलो . मंदिर नुकतंच बांधून झालं होतं. पायातले बूट काढून मी आत गेलो . गाभार्यात जावून नमस्कार करावा म्हणून आत गेलो . आणि बघतो तो काय !


...आत देवच नव्हता !

अजून मूर्ती स्थापना व्ह्यायची असावी ! हे भवानी मातेचं मंदिर आधी मेन रोडवर होतं , इतक्यातच लोकांचा प्रतिकार डावलून महापालीकाने ते टेकडीवर हलवण्याचा निर्णय घेतला होतं हे ठावूक असूनही मी थोडा निराश झालो . मी काही फारसा भाविक किंवा देवभोळा नाही तरी इतके कष्ट घेवून आलोच आहे तर देव दर्शन व्ह्यायला पाहिजे होतं अशी कुठेतरी खंत वाटली . मगाशी भेटलेल्या म्हातार्याचा पुन्हा राग आला . मंदिरात देव नाही तर त्याला सांगता आलं असता तसा. त्या दुसर्या माणसानेही नाही सागितलं . असं का वागतात लोकं?



त्याच निराश अवस्थेत टेकडी उतरू लागलो . मनात विचार आला कि म्हातारा परत दिसला तर त्याला जाब विचारायचाच . आणि नेमका तो एका वळणावर भेटलाच मला। तेच काम चालू होतं त्याचं . 'काय आजोबा ' मी जरा चिडूनच बोलू लागलो ' मंदिर रिकामं आहे वरचं ', 'सांगायचं नं अजून बांधकाम पूर्ण व्ह्यायचं आहे, देव बसला नाहीये ते !'. म्हातारा काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला, मग त्याच्या चेहऱ्यावर तेच ट्रेड मार्क हसू उमटलं. तो उत्तरला 'अरं माजा द्येव हाय कि वरला .' माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. म्हातारा पुढे म्हणाला , ' अरं आमी गरीब मान्स , कचरा इकून पैका जोड्तू , वरल्या अंगाला एक पडका हौद दिसला का न्हाई तुला , थितच आमच्या पाट्या टाक्तू , मुकादम थितच हिसाब करतू अन पैका देतु . त्या हौदापाशी माज्या पोरासोरंच प्वाट हाय बघ, मग त्योच माझा द्येव न्हाई का ?' सांग तूच '. ..

मी गारच झालो . म्हातारा खूप मोठा विचार मांडत होता . त्याच्या सुरकुतलेल्या चेह्र्याय्वर आता मला त्याच्या आयुष्याचं तत्वज्ञान दिवसायला लागलं . त्याचा देव त्याला पक्का ठावूक होता. तो अजिबात खोटं बोलला नव्हता . मला माझीच लाज वाटली . म्हतार्यानी पुन्हा माझ्यकडे पहिला . 'समद्या वाटा द्येवापातूर जात्यात बाबा. आपली अपुन वळखावी . द्येव घावतोच ...' म्हातार्याने मला पुरता अवाक केलं होता. मनात बरंच काही साचू लागलं. मी नुसताच 'खरय ' असा मोघम उत्तर देवू शकलो. घरी परतलो .



एव्हाना चांगली लख्ख सकाळ झाली होती . अस्वस्थता वाढत होती. खिडकीपाशी येवून बराच वेळ मी त्या मंदिराकडे पाहात राहिलो . विचार करत राहिलो . म्हातार्याच्या बोलण्याचा अर्थ लावत राहिलो . एकाएकी मला त्या मंदिराभोवती अभंगाचा एक मोठा ढग तरंगताना दिसू लागला. आजवर नीट नं उमगलेला देव , धर्म , दैवी अस्तित्व आणि त्या अभंगातला गहन गूढ आशय मनोमन उलगडू लागला ....स्पष्ट होत गेला...


देव देव्हार्यात नाही,
देव नाही देवालयी

देव अंतरात नांदे ,
देवा दाही दिशी कोंडे

देव आभाळी सागरी ,
देव आहे चराचरी

देव शोधुनिया पाही ,
देव सर्वभूता ठायी

देव देव्हार्यात नाही ,
देव नाही देवालयी !

3 comments:

  1. अघधी खरं आहे. तुमचा देव तुम्ही ठरवायचा आसतो. तुमचा देव म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे, तुमची स्पुर्थी आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. शेवटची कविता फार छान लिहीली आहे. लवकरच तुमच्या या ब्लोगवर आधारीत मी माझा ब्लोग लिहिणार आहे. तुम्ही अनेक गोष्टी लिहा आणि एक छान छोटासा पुस्तक प्रदर्शित करा. मराठी माणसाला फार गरज आहे तुमच्या विचारांची. जय महाराष्ट्र. फार छान.

    ReplyDelete
  2. सही....
    एक वेळ मला अस वाटल कि मी मराठी पुस्तकच वाचत आहे.
    खरच सर तुम्ही पुस्तक लिहायला घ्या.
    वाचताना, दृश लगेच डोळ्यासमोर येतात आणि वाचणाऱ्याला धरून ठेवतात कि पुढे काय असेल.

    ReplyDelete
  3. खरच सर तुम्ही अगदी सुरेख विषयवार ब्लॉग लिहलात.ते आजोबा खरच आपल्याला तत्वज्ञान सांगून गेले.आपणच आपला देव शोद्यचा असतो..एक अभंग आहे जो मला फार आवडतो तो मला इथे सांगावासा वाटतो शोधिसी मानवा राहुनी मंदिरी ||
    नांदतो देव हा आपुल्या अंतरी ||
    देव हा आपल्यात नांदत असतो तो कोठेही शोधून सापडत नाही..हा याचा अर्थ.
    सर मला असे वाटते कि तुम्ही खरच एखादे पुस्तक लिहायला हवे .खूप छान लिहिता तुम्ही.

    ReplyDelete