Friday, April 23, 2010

आज का अर्जुन !

आज का अर्जुन !

लहान मुलं आपल्याला खरंच कधी-कधी मोठ्या मुष्किल परिस्थिती मधे टाकतात. उत्तर नाही दिलं तर त्यांचं कुतूहल मारल्याचं असमाधान आणि उत्तर दिलं तर आपलीच फजिती होण्याचा संभव, अशा, इकडे आड आणि तिकडे विहीर परिस्थितीत आपण सापडतो .

परवा असंच झालं. मुलाला घेवून एका लग्नात गेलो होतो. माझे एक दूरचे नातेवाईक भेटले. वयस्कर. ६५-७० वयाचे असतील. आमच्या गप्पा चालू झाल्या. त्यांनी डोक्यावर 'फर' ची कॅप घातली होती. मुलगा बराचवेळ त्यांचं निरीक्षण करत होता. थोड्यावेळानी तो माझा हात ओढायला लागला. मी अनिच्छेने त्याच्याकडे बघितलं . मनात वेगळ्याच शंका. शु /शी तर नसेल ! असल्या गोष्टी मुलांना नको तेव्हा हमखास आठवतात. पण तसलं काही नव्हतं ... 'काय रे ?' मी जरा त्रासूनच विचारलं. 'बाबा यांनी घरात टोपी का घातलीये?', 'आमच्या मिस म्हणतात घरात आणि शाळेत टोपी घालायची नाही, फक्त उन्हात आणि आऊट डोअर चालते घातली तर'. मुलाचे धीट आणि थेट उत्तर आले. 'अरे ते काढतील थोड्या वेळानी' . काहीतरी वेळ मारून नेण्यासाठीच माझं उत्तर. मुलाचं कुतूहल संपलं नव्हत. उलट थोडं वाढलंच असावं .

नंतर जेवणाची वेळ होईपर्यंत त्याची नजर पूर्णत: त्या काकांवरच होती. 'काका टोपी कधी काढणार ?' हा प्रश्न त्यांनी किमान पन्नास वेळा तरी विचारला असेल. मी काहीबाही सांगून थकत चाललो होतो. जेवणाची वेळ झाली. काका पंगतीकडे जावू लागले. मुलगा पुन्हा हात ओढू लागला. 'बाबा भूक लागली '. आप्तांशी रंगलेल्या गप्पा अर्धवट टाकून मीही जेवणाच्या हॉलकडे चालू लागलो. मुलगा काकांच्या शेजारच्या रिकाम्या जागेवर पळत गेला. ओघाने मीही त्याच्या शेजारीच बसलो. मुलाचा पुन्हा प्रश्न: 'बाबा , हे टोपी का काढत नाहीयेत अजून?'. 'अरे टोपी त्यांची आहे , त्यांना वाटेल तेव्हा काढतील , तुला काय? तू घरी बूट घालून जेवतोस का कधी ? पण इथे बूट घालून जेवणार आहेस नं ?' मी जमेल तेव्हढ
लॉजिक एकवटून त्याला शांत करत उत्तरलो. पण छे ! ...मुलगा माझाच होता. त्यानी माझ्याकडे पाहून जीभ बाहेर काढून फक्त 'ऊ ssssss' करून वेडावून दाखवलं.

जेवण संपेपर्यंत तो काकांकडे वळून वळून बघत होता. मी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न करून बघितले. त्याला जिलेबीचं आमिषही दाखवून पाहिलं. पण व्यर्थ !

जेवणं होत आली. हातावर पाणी पडताच मुलानी त्याच्या मोठ्या चुलत बहिणीकडे धाव घेतली. माझी उत्तरं त्याला अगदीच निरर्थक वाटली असावीत म्हणून तो आता त्याच्या मोठ्या बहिणीकडे 'एक्स्पर्ट ओपिनियन' घ्यायला पळाला होता. माझी त्या भयंकर परिस्थितीमधून सुटका झाली म्हणून मला मात्र जरा हायसं वाटत होतं. थोडा वेळ सुखात गेला.

लोकं एकमेकांचा निरोप घेवून जायला लागले. आमचीही जाण्याची वेळ आली. आम्ही बाहेर पडू लागलो . मुलगा आता गालातल्या गालात हसत होता. त्याच्या बहिणीने त्याला काय सांगितलं होतं कुणास ठावूक ! मला पुढच्या संभाव्य धोक्याची जाणीव झाली..... आणि तेव्हढ्यात नको ते घडलंच !

तेच काका, काकूंबरोबर बाहेर पडत होते. मुलगा क्षणाचीही उसंत न घेता ओरडला ' काकाआजोबा मला माहितीये तुम्ही टोपी का नाही काढलीत ते. आर्याने सांगितलंय मला ... तुम्हाला टक्कल पडलाय न ? ही: ही: ही:..... काका ओशाळले. काय ऊतर द्यावे ते त्यांना कळेना. मी तर संपलोच होतो. एव्हाना आजूबाजूची चार टाळकिही बघायला लागली होती . 'अर्जुनsss बाsssस , माsssर मिळेल आता', मी उसन्या अवसानाने ओरडलो. मुलगा जरा शांत झाल्यासारखा दिसला. काही क्षण तीच असहाय्य शांतता...

काका ओशाळवाणे हसत जावू लागले आणि मुलगा पुन्हा निर्णायक ओरडला 'आता तरी टोपी काढा नं काकाआजोबा, मला तुमची गम्मत माहितीये , ही: ही: ' !

'बॉम्बे टू गोवा' पिक्चर मधला एका सीन आठवला. एका द्वाड मुलाला त्याचे आई बाप मुसक्या बांधून नेतात ते दृष्य आठवलं. त्या वेळी तरी मला अर्जुनला तसंच काही करावंसं वाटलं होतं.


4 comments:

  1. kharach 'Aaj Kaa Arjun'ch aahe to... lol

    ReplyDelete
  2. hehehhe kharch kiti niragas astat na lahan mule.yach he example......
    AAj ka Arjun.nahi Abhiram sir ka Arjun!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  3. हो तो खरोखरच आज का अर्जुन आहे!
    त्याने एका तीर मध्ये ४ लक्ष्य उडवलीत.
    १. टोपी
    २. टक्कल
    ३. टोपीचे रहस्य
    ४. त्याचे पपा

    ReplyDelete